Share

नवाब मलिक तुरूंगातच कोसळले; प्रकृती गंभीर, तातडीने जे. जे. रूग्णालयात हलवलं

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे मनी लॉड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्याबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नसून, ते तुरुंगात कोसळले आहेत. त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी आहेत, अशी माहिती मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली आहे. याआधी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ईडीने जामीन अर्जाला विरोध केला होता.

आज म्हणजेच सोमवारी दुपारी कारागृहात ते कोसळल्यानंतर नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी मलिक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावर, ईडीने म्हंटलं की, जे जे रुग्णालयाकडून अहवाल मागवा आणि ते त्याच्यावर उपचार करू शकत नाहीत असे सांगू द्या, तर दुसरीकडे विशेष न्यायाधीशांनी जेजे रुग्णालयाला आवश्यक चाचणी सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत की नाही याचा अहवाल सादर करण्यास सांगितले. हा अहवाल 5 मे पर्यंत सादर करायला सांगितलं आहे.

दरम्यान, फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण मलिकचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संलग्न मालमत्तांच्या खरेदीत पैशाच्या गैरवापराशी संबंधित आहे.

आरोपपत्र दाखल केल्यावर ईडीच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेईल. सध्या नवाब मलिक यांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now