Navneet Rana: अमरावती जिल्ह्यातील धारणी (Dharni) नगरपंचायतीच्या प्रचारसभेला रंगत आली, जेव्हा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि स्थानिक भारतीय जनता पक्ष (BJP) उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी “दादा, मला आता म्हणावंसं वाटतं की मी पुन्हा येईन” असे वक्तव्य करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
नवनीत राणा म्हणाल्या की, “टी को लाना है वापस की नही, दादा ठरवा. पराभव झाल्यानंतरही आम्ही मेहनत सोडली नाही. देवेंद्र भाऊ, महिलांसाठी तुम्ही नेहमी पुढे उभे राहता. तुमचा हात आमच्या डोक्यावर आहे, ही आमची ताकद आहे.” त्यांच्या या वक्तव्याला टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “तुमच्या आशीर्वादाने नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाहीत.” त्यांनी धारणीच्या विकासकामांवरही प्रकाश टाकला.
ते म्हणाले, “धारणीसाठी 52 कोटींची आणि चिखलदरा (Chikhdara) परिसरासाठी 55 कोटींची पाणीपुरवठा योजना केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर केली आहे. घराघरात पाणी पोहोचवणे हे आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक शहरात बंद गटार व्यवस्था उभारून सांडपाणी प्रक्रिया करण्याची मोठी योजना सरकार राबवत आहे.”
आपल्या भाषणाचा पुढील भागात फडणवीस म्हणाले की, “मोदी (Modi) यांच्या अजेंड्यावर काम करणारे लोक निवडले पाहिजेत. आधी 1300 आजारांसाठी उपचार मिळत होते, आता 2400 आजारांवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करणार आहोत. धारणीच्या 50 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे 100 बेडमध्ये रूपांतर करण्याचा निर्णयही घेतला आहे.”
विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची केलेली टीका त्यांनी फेटाळून लावत सांगितले, “जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत योजनेचा निधी थांबणार नाही. आम्ही येऊन पळून जाणारे लोक नाही.”





