Narendra Modi : महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल शासक औरंगजेब यांच्यावरून राज्यात वादंग पेटले असताना, भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने आणखी एक नवा वाद निर्माण केला आहे. ओडिशातील बारगढचे भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा केला. त्यांच्या या विधानानंतर संसद आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, विरोधकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
खासदार पुरोहित यांचे वादग्रस्त विधान
प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, ते एका साधूला भेटले होते. त्या साधूने त्यांना सांगितले की पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पुढे ते म्हणाले की, मोदी हेच खरे शिवाजी महाराज असून, देशाला प्रगती आणि विकासाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी पुनर्जन्म घेतला आहे.
संसदेत विरोध, भाजपने घेतला पल्ला
या विधानावर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभेच्या कामकाजातून हे वक्तव्य काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंती केली. तसेच भाजप खासदार दिलीप सैकिया यांनीही विधानाची चौकशी करून ते रेकॉर्डमधून हटवण्याची मागणी केली आहे.
“हा शिवरायांचा अपमान” – वर्षा गायकवाड यांची टीका
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. X (ट्विटर) वर पोस्ट करत त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले की –
“अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. छत्रपतींच्या मानाचा जिरेटोप मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला जात आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.”
सोशल मीडियावर संतापाची लाट
प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेक नागरिकांनी हे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या या भूमिकेवर शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मोदींनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली जात आहे.






