सध्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांचे त्या ठिकाणी प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना मायदेशी आणले तर काहीजण अजून तिथेच अडकून आहेत. या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात प्रचंड आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील संधी शोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या शैलीत टोला लगावला आहे. म्हणाले, रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे, याचा परिणाम युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या हजारो विद्यार्थ्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी उद्या पुण्यात अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी 6 मार्चला येत आहेत.
हे महत्त्वाचं आहे पण या महत्त्वाच्या प्रकल्पांसोबत मुलांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. बघूया, आता देशाची सूत्रं ज्यांच्याकडे आहेत ते याची गांभीर्याने नोंद घेतायेत असं आपण समजूयात. असं शरद पवार म्हणाले.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललोय. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही, पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा या विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे. युक्रेनमध्ये कमी फी मध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. इथे 95 टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे साठ टक्क्यांना प्रवेश मिळतो, यावर विचार करावा. युक्रेन आणि रशिया संघर्षामध्ये आपण कोणाची बाजू घेत नाही. त्यामुळे भारत सरकारच्या याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेबाबत टिका टिपणी करण्याची गरज नाही, असे म्हणाले.
चीन आणि भारत यांच्यासह आणखी दोन देशांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे काही नवीन नाही. पंडित जवारहलाल नेहरु हे या देशाचे नेतृत्व करत होते त्यावेळेस सुद्धा जी आपली पॉलिसी होती त्या पॉलिसीमध्ये शक्यतो संघर्षामध्ये आपण कोणाचीही बाजू घेऊ नये अशीच होती. त्यामुळे आज या ठिकाणी केंद्र सरकारने जी भूमिका घेतली आहे त्याबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही.’असे शरद पवार म्हणाले.