केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या विधानाने नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. काल गणपती बाप्पाचं आगमन झालं या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विविध राजकीय मुद्यावर त्यांनी भाष्य केलं. दरम्यान त्यांनी केलेल्या काही विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
नारायण राणे यांनी सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा वेब पोर्टलशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कामाची प्रशंसा केली. म्हणाले, कोरोना काळात तर मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवलं.
तसेच म्हणाले, पंतप्रधान म्हणून मोदी उत्कृष्ट काम करत आहेत. देशात अनेक योजना त्यांनी आणल्या यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय, महिलांसाठीच्या योजना असतील किंवा अनेक विकासाच्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत.
कोरोनाच्या काळातही त्यांनी संकटात सापडलेल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं. औषधांचे शोध लावले, इंजेक्शनचे शोध लावले, वेगवेगळे डोस देण्यात आले. आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो पण मोदींनी ते करुन दाखवलं. त्यामुळं मला अभिमान आहे की मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे असे राणे म्हणाले.
देशाला योग्य पंतप्रधान मिळालेत अतिशय चांगला कारभार ते करत आहेत. ते भारताला आत्मनिर्भर भारत बनवतील असा मला विश्वास वाटतो, असे म्हणत मोदींचं कौतूक केलं. तसेच, यावेळी त्यांनी मागील उद्धव ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला.
महाराष्ट्रात सत्तांतर झालं ही गणेशाची कृपा, महाराष्ट्रात यावर्षी गणेशाच्या आगमनापूर्वीच सत्तांतर झालं, ही गणरायाची कृपा आहे. त्यामुळं राज्यातील अडीच वर्षांपासूनच संकट टळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं.
अडीच वर्षात कायदा सुव्यवस्था नव्हती, विकास नव्हता. कोणत्याही क्षेत्रात उद्धव ठाकरेंच सरकार काम करु शकलं नाही. लोकांना न्याय देऊ शकलं नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. त्यांनी दिशा सालियान हत्येबाबत बोलताना म्हटले की, निरपराध माणसांना मारलं गेलं आणि यामागे सरकारच्या काही लोकांचा हात आहे.






