Narayan Rane On Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले, भाऊबंदकी…

Narayan Rane On Uddhav Thackeray:  5 जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम (Worli Dome) येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (Shivsena) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेचा संयुक्त विजयी मेळावा आयोजित केला जात आहे. त्रिभाषा धोरणाच्या रद्द केलेल्या जीआरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने एकत्रितपणे हा भव्य मेळावा आयोजित केला आहे.

या ऐतिहासिक मेळाव्यामुळे तब्बल २० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. दोघेही एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असून संजय राऊत (Sanjay Raut), अनिल परब (Anil Parab), वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यासह बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), अभिजीत पानसे, संदीप देशपांडे हे तयारीचं नेतृत्व करत आहेत.

नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया – “जो बूंद से गई…”

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत म्हटलं की, “जो बूंद से गई, वो हौद से नहीं आती.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ‘भाऊबंदकी’च्या नात्याने परत जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हेच उद्धव ठाकरे कधीकाळी राज ठाकरे यांना पक्षातून बाहेर जाण्यास प्रवृत्त करणारे होते. “राज ठाकरेंना त्रास देणारे आता पुन्हा का लाळ ओकत आहेत?” असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला.

नारायण राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, “राज ठाकरे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी स्वतः, या सर्वांनी शिवसेनेच्या वाढीसाठी आयुष्य वेचलं. पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेला सत्तेवर बसवलं, तर उद्धव ठाकरेंनी ती सत्ता घालवली.”

“उद्धव ठाकरेंमध्ये गमावलेले परत मिळवण्याची धमक नाही”

राणेंनी यावर थेट टिपणी करत म्हटलं, “उद्धव ठाकरेंमध्ये गमावलेली ताकद परत मिळवण्याची क्षमता नाही. मराठी माणसाने आणि हिंदूंनी यांना आता घरी बसवलेलं बरं.” त्यांच्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित करण्यात आली आहे. ‘भाऊबंदकी’ने पक्ष आणि जनाधार पुन्हा मिळवता येणार नाही, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला आहे.