Nana Patole : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात तीव्र गदारोळ पाहायला मिळाला. याचे कारण ठरले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) नेते आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप नेते आणि मंत्र्यांवर केलेले टीकेचे जोरदार फटके. भाजपचे (BJP) नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यावरून नाना पटोले यांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली.
“मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही” – नाना पटोलेंची घणाघाती टीका
सभागृहात बोलताना नाना पटोले म्हणाले, “बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे हे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्री आणि सरकारने यावर खुली माफी मागावी. ‘मोदी (Narendra Modi) तुमचा बाप असेल, पण शेतकऱ्यांचा नाही,’ अशी कडक शब्दात मी स्पष्ट भूमिका घेतो.” या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. काही सदस्यांनी या शब्दांचा निषेध करत, त्याला असंसदीय ठरवण्याची मागणी केली.
सभागृहातील गोंधळ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी नाना पटोलेंच्या शब्दांना असंसदीय म्हणत सभागृह ५ मिनिटांसाठी तहकूब केलं. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट अध्यक्षांच्या डायसपुढे येत राजदंड (Mace) समोर उभं राहत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांच्या अपमानावर जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.
काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने नाना पटोले यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांचे मुद्दे ठामपणे मांडले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, बी-बियाण्यांच्या वाढत्या किंमती, विमा योजनेतील फसवणूक यांवर चर्चा करण्याऐवजी, राज्यातील नेते शेतकऱ्यांविषयी अपमानकारक बोलत असल्याची गंभीर टीका त्यांनी केली.
यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी नाना पटोले यांच्यावर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई जाहीर केली. यानंतर सभागृहातील वातावरण आणखी तापलं. नाना पटोलेंच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहात काही काळ कामकाजात व्यत्यय निर्माण झाला.
राजकीय वातावरण तापलं
या घडामोडीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सभागृहात वादळ उठवणाऱ्या या मुद्द्यावर मुख्यमंत्री, कृषीमंत्री किंवा भाजप नेत्यांकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.