Vikram Gokhale death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या १८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ते ॲडमीट होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चित्रपट सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समाज माध्यमांवर अनेक कालाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर सुद्धा विक्रम गोखले यांच्या निधनानंतर भावूक झाले आहेत. आपली प्रतिक्रीय देताना ते म्हणाले ‘विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….’
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर हा दुर्मिळ आजार झाल्यामुळे उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांची खूपच प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशीरा त्यांची प्रकृती अतिशय चांगली होती पण आता त्यांचे निधन झाले.
विक्रम गोखले यांनी १९७ साली वयाच्या २६व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता, ज्याचे नाव होते परवाना. विक्रम गोखले हे ‘हम दिल दे चुके सनम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी ओळखले जातात. या चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
विक्रम गोखले यांना २०१० मध्ये मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत.
विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे. निधनाच्या अफवांमुळे कुटुंबीयांना प्रचंड मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. समाज माध्यमांवर अनेक कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहीली.