Share

‘पुणे-मुंबईची भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही’, नागराज मंजुळे असं का म्हणाले?

Nagraj Manjule

आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यादरम्यान एबीपी माझा वाहिनीतर्फे ‘अभिजात मराठीचा जागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी मराठी भाषेबद्दल बोलताना प्रत्येकाने आपली बोलीभाषा जपली पाहिजे, असं मत मांडलं आहे. तसेच पुणे-मुंबईची भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाषा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमादरम्यान साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीदरम्यान बोलताना नागराज मंजुळे यांनी म्हटले की, आपण प्रमाणभाषा बोलण्याच्या नादात बोलीभाषा विसरत चाललो आहोत. ‘जब्या’ चित्रपटावेळी मला काही लोकांनी म्हटले की, ही भाषा कोणाला कळणार नाही. त्यामुळे तुमची भाषा जरा नीट करा’.

‘मला वाटलं की, भाषा नीट करायचं म्हणजे काय करायचं? भाषेत हिंदी, इंग्रजी शब्द घालून त्यालाही मेकअप करायचं का? हे खूप वाईट आहे. पण मी ठरवलं होतं की, जब्या असे नाही बोलणार. तो त्याच्या बोलीभाषेतच बोलणार. त्यानंतर ‘फॅन्ड्री’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि ही भाषा सर्वांना कळाली. यामुळे ‘सैराट’ चित्रपटावेळी माझा आत्मविश्वास वाढला की, आपण चित्रपटात आपली बोलीभाषाच वापरावी. आणि ही भाषा खरंतर जास्त लोकांची भाषा आहे’.

नागराज यांनी पुढे म्हटले की, ‘पुणे-मुंबईची भाषा म्हणजे महाराष्ट्राची भाषा नाही. मुंबईत असणारी अनेक लोकं मुळची मुंबईची नाहीत. तिथे अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. त्यामुळे भाषा बदलून जाते. त्यामुळे तिथे प्रमाणभाषा बोलली जाते. इंग्रजी बोलता येते म्हणजे खूप भारी असं काही नाही. इंग्रजी किंवा हिंदी भाषा नाही तर मराठी भाषासुद्धा मराठीला मारू शकते, अशी खंतही नागराज यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आज मराठीतील प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे. यानिमित्ताने राज्यभरात दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

महत्त्वाच्या बातम्या :
काही मराठी कलाकारच स्वतः हिंदीत बोलतात तेव्हा ते ऐकून.., अतुल गोगावलेंनी व्यक्त केली खंत
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत? मकरंद अनासपुरेंसोबत साकारली होती महत्वाची भूमिका
‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राला मिळाली चित्रपटात काम करण्याची संधी, लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार?

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now