Share

कशी तयार झाली ‘झुंड’ चित्रपटातील फुटबॉल खेळणाऱ्या मुलांची टीम? नागराज मंजुळेंनी सांगितला किस्सा

Nagraj Manjule

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. शुक्रवारी (४ मार्च) हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. या चित्रपटात झोपडपट्टीत राहणारी मुले फुटबॉल टीमचे सदस्य कसे बनले हे दाखवण्यात आले आहे. तर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या फुटबॉल टीममधील मुलांची म्हणजेच कलाकारांची निवड कशाप्रकारे झाली? त्या टीमला निवडण्यामागे काय विचार होता? यासंदर्भात नागराज मंजुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते.

‘झुंड’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागराज मंजुळे झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांना कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे याने चित्रपटातील संपूर्ण टीम नेमकी कशी तयार झाली? याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी नागराज मंजुळे यांनी यासंदर्भात संपूर्ण किस्सा सांगितला.

नागराज मंजुळे यांनी म्हटले होते की, ‘झुंड हा चित्रपट नागपूरच्या लोकांवर आधारित आहे. त्यामुळे मी विजय बारसे आणि त्यांचे इतर विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वर्णनानुसारच पटकथा लिहिली. त्यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ही सर्व मुले नागपुरातील असून सर्वजण टपोरी भाषा बोलणारी आहेत. त्यांचे पात्र लिहित असताना मला वाटले की, नागपूरमधील मुलेच या पात्रांना न्याय देऊ शकतील’.

पुढे नागराज मंजुळे यांनी सांगितले की, ‘त्यानंतर मी, माझा भाऊ आणि माझ्या मित्राने पात्रास योग्य अशा मुलांची शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी आम्ही जवळपास दीड ते दोन महिने नागपुरात होतो. कधी दुपारी, तर कधी संध्याकाळी आम्ही एखाद्या गल्लीत जाऊन, झोपडपट्टीत, पाण्याच्या टाकीजवळ अशा ठिकाणी मुलांचा शोध घेतला’.

https://youtu.be/82eicB2i0VY

‘त्यानुसार एके दिवशी आम्ही एका वस्तीत शिरलो. तेव्हा तिथे काही मुले मस्ती करत असल्याचे आम्हाला दिसले. त्यावेळी माझ्या भावाने त्यांना ऑडिशन देणार का? असे विचारले. तर हा प्रश्न ऐकून सर्व मुले शांत झाले’, असे नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे ते हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट समाजसेवक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बरसे हे एक निवृत्त क्रिडा शिक्षक होते. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग दिली. त्यांनी स्लम सॉकर नावाच्या लीगची स्थापना केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा संपूर्ण प्रकरण
आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रींना देण्यात आली होती ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची ऑफर, दिग्गज अभिनेत्री होत्या स्पर्धेत
झुंड चित्रपटाच्या प्रमोशनला अमिताभ बच्चन का दिसले नाहीत? चित्रपटाला होतंय नुकसान, चर्चांना उधाण

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now