नुकतेच भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी महाराष्ट्रातील शिवसेना लवकरच संपुष्टात येणार, आणि कमळ फुलणार असं वक्तव्य केलं. यावर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नड्डा यांचा समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपची साथ सोडण्याचं आवाहन केलं आहे.
सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं की, शिवसेना संपत चालली आहे असं म्हणणाऱ्या नड्डा यांना जाब विचारत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वाभिमान राखत तातडीने भाजपपासून बाहेर पडून राजीनामा दिला पाहिजे.
शिवसेनेचा अंत जवळ येत आणि एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की आमचीच शिवसेना खरी. मग नड्डा नेमकी कोणती शिवसेना संपवायला निघाले आहेत? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. शिंदे गटातील नेत्यांना देखील त्यांनी सवाल केला.
म्हणाल्या, शिवसेना वाचवण्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे, असं मुख्यमंत्री म्हणतात. तर केसरकर, गोगावले, शिरसाट उर बडवून सांगतात आमचीच शिवसेना खरी. मग आता ते नड्डा यांना काही ऐकवणार आहेत का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला केला.
पुढे त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा मुद्दा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, भगतसिंह कोश्यारी नावाचे राज्यपाल आपल्या घटनात्मक पदाची गरिमा विसरून महाराष्ट्रात दुही निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीच बोलत नाहीत.
दरम्यान, सुषमा अंधारे या मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत होत्या. मात्र, नुकताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे कुटुंब संकटात असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रचंड आक्रमक नेत्या आहेत.