प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली भैसने-माडे हिने तिच्या जीवाला धोका असल्याची पोस्ट शेअर केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबड उडाली आहे. मराठमोळ्या गायिकेची पोस्ट वाचताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. चाहत्यांनी कमेंट करत वैशालीला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
वैशाली ने फेसबुक पोस्ट वर लिहिले आहे की, “काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. मात्र आज मला तुमच्या मदतीची गरज आहे.” असे तिनं लिहिले आहे. चाहते तिच्या या पोस्ट वरून तर्क-वितर्क लावत आहेत. अनेकांनी तिला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
https://www.facebook.com/100044271977390/posts/494981131987615/
सारेगमप या मराठी गायन रिअँलिटी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाच्या “रॉक घराणा”ची ती सदस्या होती. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली. नुकताच तिने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
वैशाली ही शेतकरी कुटुंबातून आली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केलंय. ‘भारतरत्न’ लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.
तसेच तिनं ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं गायलंय. मराठी सिनेमातही तिनं अनेक गाणी गायली आहेत. शिवाय हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला आहे. मात्र आता याच वैशाली भैसने हिने तिच्या जीवाला धोका असल्याची अचानक पोस्ट केल्याने, सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की, ताई आम्ही सोबत आहोत, काळजी घ्या. तक्रार नोंदवा. तक्रार घेत नसतील तर पोलीस, गृहमंत्री यांना इमेल करा. ताई तुमच्या जीवाला धोका आहे अश्या धमक्या येतात तर तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा आणि जो कोणी आहे त्याच्या नावासकट करा. सर्व पुरावे सादर करा, कॉल रेकॉर्ड, मेसेजेस अस काही असेल ते सर्व द्या. पोलिस तुम्हाला संरक्षण देतील आणि त्या आरोपीला अटक करतील. आम्ही तुमच्या सोबत आहोत घाबरू नका.