राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड रविवारी ठाण्यात ओबीसी राज्यस्तरीय शिबिरात बोलत होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील ओबीसी समाजाला साद घालताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, त्यांनी माझे बाबा, अरुण गवळी यांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करत होते, असे वक्तव्य करत गौप्यस्फोट केला आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशावेळी कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतर राज्यात मुख्यमंत्री कोण व्हावा हे ओबीसी समाज ठरवत असतो, मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का ठरवत नाहीत? असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
मी स्वतः ओबीसी असून मी कधीही ओबीसीचे राजकारण केले नाही. पण तुम्ही आमचे सर्व काढून घ्यायला लागल्यावर गरिबांसाठी लढले पाहिजे. राज्यात डोक्यावरती छप्पर नसलेले सर्वांत जास्त ओबीसी आणि भटके विमुक्त आहेत, पण आपल्या अस्तित्वाची लढाईच आपण लढत नाही. ओबीसी समाजाला लढायची सवय नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.
तसेच वडिलांच्या आणि आजोबांच्या संघर्षाबद्दल बोलले की, ‘माझे आजोबा व्हिटी स्थानकात हमालीचे काम करत होते. अनेक हमाल तेव्हा वंजारी समाजाचे होते, त्याचा मला अभिमान आहे. आमचे घर छोटे असल्यामुळे माझे वडील 22 वर्ष व्हिटी स्थानकातच झोपले. वडिलांची मेहनत दिवस रात्र सुरू होती. शिक्षण घेत असताना सकाळी उठून आईला मदत करायचे, भाजी घेऊन विक्रीसाठी जात होते. त्यासोबत अरुण गवळी यांच्या वडिलांच्या दारूच्या अड्ड्यावर माझ्या वडिलांनी लहानपणी पैसे मोजण्याचे काम केले आहे.’
‘दुसऱ्यांना पैसे मोजायला देण्यापेक्षा या लहान मुलाला पैसे मोजायला सांगितले तर गल्ला कितीचा होतो, हे समजेल, असे अरुण गवळी यांच्या वडिलांना वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी माझ्या वडिलांना पैसे मोजण्याच्या कामावर ठेवले होते.’ असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमात केला.
तसेच म्हणाले, मी ज्या सोसायटीमध्ये राहत होतो, त्या सोसायटीच्या सत्यनारायणाच्या पूजेला माझ्या आईला कधीच बोलवले नाही, हे आम्ही कसे काय विसरू शकतो. राज्यात 354 जाती असून या जातींपैकी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या केवळ 16ते 17 जाती आहेत. आजही सगळ्या जाती दऱ्या-खोऱ्यांत, पाडे आणि वस्त्यांवर राहतात. त्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगती करण्याची गरज असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.