‘१२ वी’च्या पेपरच्या दिवशीच झाला वडिलांचा मृत्यु, पेपर लिहीताना घळाघळा वाहत होते अश्रू

काल बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. मुलगा पेपर देण्यासाठी जातच होता तेवढ्यात त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्याच्या कानावर आली. त्याची पेपर देण्यासाठी जाऊ की नको अशी स्थिती झाली. अशावेळी त्याच्या समोर ‘शिक मोठा हो’ असे वडील बोलत असलेल्या आवाजाची आठवण आली आणि तो काळजावर दगड ठेवून पेपरला गेला.

गणेश कांबळे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. काल त्याचा 11 वाजता पेपर होता. त्याचीच तो तयारी करत होता. तेवढ्यात त्याला वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली. त्याचे वडील महादेव कांबळे हे नगरपालिकेत सफाई कामगार होते. आपल्या वडिलांची मेहनत गणेश रोज आपल्या डोळ्यांनी पाहत होता.

कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही याची जाण गणेशला होती. वडिलांना देखील मुलाने शिकून मोठं व्हावं असेच वाटत होते. मात्र, वडिलांचे अचानक निधन झाले आणि तो सुन्न झाला. पेपरला जाण्याची त्याची अवस्था नव्हती. काय करावं त्याला सुचेना झालं. ही घटना कागल तालुक्यातील मुरगूड मधील आहे.

अशावेळी, कॉलेजमधील त्याच्या शिक्षकांनी त्याला धीर दिला. गणेशला त्यांनी पेपरला जाण्यास सांगितले. वडिलांच्या आपल्याकडून काय अपेक्षा होत्या, हे त्याला सतत आठवत होते. तो पेपर देण्यासाठी तयार झाला. पेपर तीन तासाचा होता. पेपर देते वेळी त्याने त्याच्या भावना दाबून ठेवल्या, आणि सगळा पेपर सोडवला.

जेव्हा त्याने शेवटचा प्रश्न सोडवला तेव्हा त्याच्या डोळयातून पाणी येऊ लागले. वडिलांच्या आठवणीत तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याचा पेपर होईपर्यंत वडिलांचे अंत्यसंस्कारसाठी लोक थांबले. पेपर झाल्यावर तो लगेचच घराकडे गेला आणि त्यानंतर त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सध्या गणेशने जो धीर धरला आणि पेपर दिला याबद्दल सगळे त्याचे कौतुक करत आहेत. गणेशला वडिलांनी केलेली मेहनत क्षणोक्षणी आठवत होती. ‘शिक आणि मोठा हो’ हा वडिलांचा आवाज त्याच्या कानात गुंजत होता. त्यामुळे तो देखील स्वतःच्या भावनांना आवर घालत पेपर देण्यासाठी गेला. वडिलांच्या जाण्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.