बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. एका मुलाखतीत त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तो सध्या ट्रोल होत आहे. सोनू निगमने केलेल्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याने नवरात्रीला मटण बंदी कशाला? असे वक्तव्य केले आहे.
सोनू निगमने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्याच्या या वक्तव्यावर अनेक लोक भडकले असून त्याला ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी सोनू निगमने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, नवरात्रीदरम्यान मटणाची दुकानं बंद करणे चुकीचे आहे.
तसेच म्हणाला होता की, नुसतं जय श्रीराम मुखानं बोललो म्हणजे मी त्याचा निस्सिम भक्त झालो असं होत नाही. नवरात्रीला मटण खाणं कशाला बंद करायचं. एक माणूस मटण विकत आहे, त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे, तो त्याचं काम करतोय मग उगाचच तुम्ही त्याचं मटणाचं दुकान का बंद करताय? असे त्याने विधान केले होते.
Sonu Nigam problem why meat
Ban we should sonu nigam ban#BhandSonuNigamhttps://t.co/TrMaxRp6yV— Rani Singh (@RaniSingh7459) May 18, 2022
त्याच्या या मुलाखतीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला जोरदार विरोध करायला सुरुवात झाली. कोणी त्याला नवरात्रीला मटण बंदी करु नका या म्हणण्यावर धारेवर धरताना दिसला तर कुणी श्रीराम संदर्भातल्या त्याच्या वक्तव्यावर त्याला सुनावताना दिसला.
दरम्यान, सोनू निगमने काही दिवसांपूर्वी अजान वरून देखील आपले मत व्यक्त केले होते, ज्यामुळे तो प्रचंड ट्रोल झाला. 2017 मध्ये सोनूने आपल्या ट्वीटच्या माध्यमातून मशिदीवरील भोंग्यातून मोठ्यानं ऐकू येणाऱ्या अजानचा विरोध केला होता. सोनू निगमच्या त्या ट्वीटवरनं खूप गोंधळही माजला होता.
मात्र, वादात ओढले गेलोय आणि ते महाग पडणार हे लक्षात आल्यावर सोनूनं एक पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं लोकांसमोर मांडलं होतं. त्यावेळी तो म्हणाला की, मी फक्त एका सामाजिक विषयावर माझं मत मांडलं आहे. कोणत्याही धर्माचा मी विरोध केलेला नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. हे अजान संदर्भात नाही तर भोंग्याच्या माध्यमातून होणाऱ्या आवाजाच्या तीव्रतेसंदर्भात होतं, असे त्याने स्पष्ट केले होते.






