कर्नाटकातील हिजाब वादात आता अल कायदा या दहशतवादी संघटनेने एंट्री केली. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमन अल- जवाहिरी याने एक व्हिडिओ प्रसारित करत कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी मुस्कान खानचा उल्लेख करत तिचे कौतुक केले. यावर आता मुस्कानच्या वडिलांनी आपली प्रतिक्रिया देत आयमन अल- जवाहिरीला चांगलेच खडसावले आहे.
कर्नाटकातील हिजाब वादाबाबत अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमन अल- जवाहिरी याने नऊ मिनिटांचा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये त्यानं हिजाब बंदी ही दडपशाही असल्याचे सांगत भारतीय मुस्लिमांना यावर प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले. तसेच “अल्लाहू अकबर” असा जयघोष करत “जय श्री राम” घोषणेचा प्रतिकार केलेल्या कर्नाटकातील मुस्काचे कौतुक केले.
कर्नाटक हिजाब वादावर अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीच्या वक्तव्यानंतर आता मुस्कान खानचे वडील मोहम्मद हुसैन यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, की तो कोण आहे आणि तो माझ्या देशाच्या समस्येत का गुंतला आहे हे मला माहिती नाही.
तसेच म्हणाले, माझ्या मुलीचे नाव दुसऱ्या देशातील व्यक्तीने घेणे चुकीचे आहे. मी माझ्या देशात आनंदी आहे. आमच्या देशाच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आम्हाला अल कायदाची गरज नाही, असे म्हणत दहशतवादी संघटनेच्या नेत्याचे वक्तव्य फेटाळून लावले. भारतात मी आणि माझे कुटुंब सुखी असल्याचं देखील त्यांनी सांगितले.
माझा जन्म कर्नाटकातील मंड्या येथे झाला. आम्ही सर्व भावाप्रमाणे प्रेमाने येथे राहतो. ती घटना (नारेबाजीची घटना) घडायला नको होती. आता आम्हाला शांततेत जीवन जगू दिले जात नाही. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून समाजात कोण द्वेष निर्माण करत आहेत ते पहावे. असे मुस्कान खानचे वडील म्हणाले.
मुस्कान मंड्याच्या पीईएस कॉलेजमध्ये बीकॉमच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. घोषणाबाजीची घटना घडली तेव्हा ती आपली असाइनमेंट देण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. मात्र त्या दिवशी झालेल्या घोषणेच्या घटनेनंतर तिच्या वडिलांना तिच्या पुढील शिक्षणाची काळजी वाटत आहे.
माझी मुलगी परीक्षा देऊ न शकल्याने खूप नाराज आहे. आता पुढच्या वर्षीच तिला पुढील शिक्षण सुरू करता येणार आहे. आम्ही तिला अशा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ जिथे हिजाब घालण्याची परवानगी असेल, असे मत मुस्कानच्या वडिलांनी व्यक्त केले.