नुकतेच महागायिका, लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत सृष्टीतील देवीला भारताने गमावले असताना, त्यातच आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झालं आहे. त्यामुळे संगीत सृष्टीतील अजून एक हिरा गमावला आहे. त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त केलं जात आहे.
बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी मुंबईच्या क्रिटी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहरीबद्दल येणारी ही बातमी संगीत क्षेत्रासाठी धक्कादायक आहे. रुग्णालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, बप्पी लहरी यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते आणि सोमवारीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी येण्यास सांगितले. त्यांची खालावलेली स्थिती पाहून त्यांना पुन्हा तेथून रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया) नावाचा आजार होता, या आजारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बप्पी लहरी, ज्यांना बप्पी दा या नावाने ओळखले जाते. बप्पी लहरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1953 रोजी झाला होता. 1973 सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला 1982 साल उजाडावे लागले. 1982 मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहरी प्रकाशझोतात आले.
बप्पी लहरी यांनी 70-80 च्या दशकात अशी गाणी बनवली होती, ज्यावर आजही लोक नाचायला भाग पाडतात. चलते-चलते, शराबी, डिस्को डान्सर अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी गाणी संगीतबद्ध केली. शेवटच्या वेळी त्याने टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या बागी 3 चित्रपटासाठी भंकस संगीतबद्ध केले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी बिग बॅासच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. भारतात डिस्को म्युझिक आणणारे म्हणजेच बप्पीदा अशी त्यांची खास ओळख होती. त्यांनी 1980 ते 2000 या तीन दशकात आपल्या संगीताने लोकांना भारावून टाकलं. किशोर कुमार , लता दीदी, आशा ताई , उषा उथुप , सुरेश वाडकर , सुदेश भोसले या अनेक गायकांसोबत काम केलं. त्यांच्या जाण्यानी रेट्रो म्युझिकचं पर्व संपलेलं आहे असचं म्हणावं लागेल.