मुनव्वर फारुकी या प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडीयनचे शो पाहण्यासाठी तरुण – तरुणी उत्सुक असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर फारुकी वादाच्या भोवऱ्यात आहे. त्याच्या शोमुळे समाजात वाईट परिणाम होतो, असे म्हणत त्याचे शो रद्द करण्यात यावेत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
मुनव्वर फारुकी धर्म, राजकारणा यासह अनेक मुद्द्यांवर त्याच्या शोमध्ये मोकळेपणाने बोलत असतो. त्यामुळे या सर्व प्रकारचा त्याच्या शोवर वाईट परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बंगळुरूनंतर आता मुनव्वर फारुकीचा दिल्लीतील होणारा शो देखील रद्द करण्यात आला आहे.
माहितीनुसार, २८ ऑगस्ट २०२२ रोजी दिल्लीतील मुनव्वर फारुकीचा शो होणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या परवाना शाखेने मुनव्वर फारुकीच्या शोसाठी परवानगी देण्यास नकार दिला आहे. विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनव्वरचा शो रद्द करण्याची मागणी केली होती.
तसेच विश्व हिंदू परिषदेने पत्रात म्हंटले की, जर हा शो झाला तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य याला विरोध करतील. हे पत्र विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. मुनव्वर फारुकीचा शो २८ ऑगस्ट रोजी मध्य दिल्लीतील केदारनाथ साहनी सभागृहात होणार होता.
२५ ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून फारुकी यांनी आपल्या शोमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवली त्यामुळे भाग्य नगरमध्ये नुकताच जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मुनव्वर फारुकीचा शो तात्काळ रद्द करा असे म्हंटले होते.
तसेच जर शो रद्द झाला नाही तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करून शोचा निषेध करतील असा इशारा दिला होता. दरम्यान, मुनव्वर फारुकी चा शो सतत रद्द करण्यात येत असल्याने, चाहत्यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.