आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे, यावेळी सलग पहिल्या तीन सामन्यात या संघाला पराभव पत्करावा लागला आहे, सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स या वर्षातील सर्वात कमकुवत संघ दिसत आहे. कर्णधार रोहितही निराश दिसत आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
इरफान पठाणला विश्वास आहे की मुंबई इंडियन्स अजूनही त्यांच्या जुन्या शैलीत परतण्यास सक्षम आहेत. मात्र जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त चांगल्या वेगवान गोलंदाजाची अनुपस्थिती हे मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण असल्याचे इरफानचे म्हणणे आहे.
तसेच इरफान पठाणच्या मते, मुंबई संघात बुमराह हा एकमेव चांगला गोलंदाज असून त्याला पाठिंबा देणारे कोणीही नाही. संघात अजून चांगल्या आणि वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे. तरच मुंबई इंडियन्सला पुढे भविष्य आहे असे इरफान पठाण म्हणाला.
एका शो दरम्यान इरफान म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सला माहिती आहे की अशा परिस्थितीतून कसे परत यायचे. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्येही त्याने अशी कामगिरी केली होती. आयपीएल 2015 मध्येही ते अशाच स्थितीत होते आणि उशिरा येऊन जेतेपद पटकवणारा हा संघ होता.
परंतु त्यावेळचा मुंबई इंडियन्सचा संघ वेगळा होता. यावर्षी मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह सोडून दुसरा एकही चांगला गोंलदाज नाही. जसप्रीत बुमराहला साथ देणारा गोलंदाज नसल्यामुळे या वर्षीची मुंबई इंडियन्स संघाची स्थिती वेगळी आहे. सततच्या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्माला देखील डोकेदुखी झाली आहे.
मुंबई इंडियन्स संघाची सकारात्मक बाजू सांगत पठाण म्हणाला, मुंबईची फलंदाजी अजूनही चांगली दिसत आहे कारण त्यांच्याकडे युवा टिळक वर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करत आहेत. रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्याकडून टूर्नामेंट पुढे जात असताना धावा करण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता परंतु त्यांचे गोलंदाजी विभाग कमकुवत दिसत आहे.