‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले. तर राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढण्यात आले, असा आरोप किरण माने यांनी केला. तर किरण मानेच्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्टार प्रवाह वाहिनीद्वारे सांगण्यात आले. तसेच या मालिकेतील काही महिला कलाकारांनी एका वाहिनीसोबत बोलताना किरण मानेंवर अनेक आरोप केले. तर आता या सर्व प्रकरणावर किरण मानेंनी एका पोस्टद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
किरण यांनी फेसबुकवर एक उपरोधिक पोस्ट शेअर करत या सर्व आरोपांमध्ये काही दमच नसल्याचे म्हटले आहे. किरण माने गैरवर्तन करत होता तर तेव्हाच त्याला का थोबाडलं नाही ? तेव्हाच पोलीसांत तक्रार का दाखल केली नाही ? आणि हे सांगायला पन्नास तास का लावले ? असा सवाल किरण माने यांनी त्यांच्या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.
त्यांनी लिहिले की, “महीलांशी गैरवर्तन करत होता तोSSS महिलांशी गैरवर्तSSSन… म्हणजे दूसरं काय अशणार? ‘तसलंच’ काहीतरी अशणार !!!” प्रद्युम्न जोरजोरात किंचाळत होता… मानसोपचातज्ञ प्रसन्न सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याचे हातपाय घट्ट धरून ठेवले… कॉटला बांधले… शेवटचा पर्याय म्हणून त्याला शॉक दिला !
“डॉक्टर काय झालंय माझ्या पदूला? गेले दहा दिवस शाखेत जाणं टाळतोय. फक्त कोण हा फडतूस किरण माने? काळं कुत्रं तरी विचारतं का त्याला?” असं म्हणत मोबाईलमध्ये सतत ‘किरण माने’ असं टाईपत सर्च करत असतो.. “त्याला बरा करा हो!” असं म्हणून तोंडात पदराचा बोळा कोंबुन प्रद्युम्नची आई ढसाढसा रडू लागली… डॉ. प्रसन्न सहस्त्रबुद्धे त्यांना पाणी देत म्हणाले, “हे बघा. रडू नका नक्की झालं काय? हे सविस्तर सांगा”.
प्रद्युम्नचे बाबा सांगू लागले. “अहो, ‘किरण मानेंचे महिलांशी गैरवर्तन’ अशी हेडलाईन वाचून प्रद्युम्न आणि त्याच्या मित्रमंडळींमध्ये जल्लोष चालला होता. सगळे म्हणाले, आता सापडला बेटा! आमच्या विचारधारेशी पंगा घेणं सोपं नाही. भलेभले संपवलेत आम्ही. रस्त्यावर आणूया साल्याला”. डॉक्टर हलकंसं हसले आणि म्हणाले, “हम्.. पुढे बोला…”
“तर जेव्हा त्या तीन महिलांच्या तक्रारी सुरू झाल्या. तेव्हा प्रद्युम्न, चिन्मय, तन्मय, केशव, वेदांत सगळे घरी जमले. फटाके वगैरे आणले. टीव्हीवर त्या महिला सांगू लागल्या की, किरण माने स्वत:ला हिरो समजायचा”. तन्मय वैतागून म्हणाला, “अगं होताच तो हिरो… तू पुढे मुद्याचं बोल..”
“नंतर त्या तिघींचे आरोप सुरू झाले… ‘आम्हाला टोमणे मारायचा’, ‘ॲरोगन्ट वागायचा’ वगैरे वगैरे..’ प्रद्युम्न आणि मंडळींची चुळबूळ सुरू झाली. “मुद्याचं कुणीच बोलेना रे! आपण इयत्ता पाचवी ‘ड’ मध्ये अशा तक्रारी करायचो”. तेवढ्यात हिरॉईन म्हणाली, “मला अपशब्द वापरायचा”.
प्रद्युम्न आणि गॅंग सरसावून बसली. पण ती त्यापुढे काही सांगेचना! “अगं… अपशब्द वापरत होता तर त्याला त्याचवेळी थोबाडला का नाही त्याचवेळी??? पोलीस कम्प्लेन्ट का नाही केली ?? शेजारी ज्या वयोवृद्ध लढवय्या अभिनेत्री उभ्या आहेत त्या हे सगळं ऐकून कसं घेत होत्या?? या महिलांसाठी त्या वर्षभर स्टॅंड का घेत नव्हत्या??? आणि मग हे सांगायला पन्नास तास का लावले???? तोवर किरण माने फेमस झाला ना.. छ्या!! काही दमच नाही रे आरोपांमध्ये…” असे अनेक प्रश्न चिन्मय तन्मय प्रद्युम्न गँगला सतावू लागले…
“मुलाखत संपली. नैराश्याचं वातावरण पसरलं. तेवढ्यात शाखेच्या ग्रुपवर मेसेज आला… ‘ठीक आहे. ठोस काही हाती लागलं नाही. तरीही यावर आपण किरण मानेला बदनाम करत राहू. लागा कामाला. खाड खाड खाड खाड फेक अकाऊंटस् उघडली गेली. प्रोफाईल लॉक चार चार वेळा चेक केलं आणि सुरू झालं..’किरण्या तुझा बाजार उठला रे……..”
…तोवर संध्याकाळी ‘मुलगी झाली हो’ मध्ये काम करणार्या चार महिला टी.व्ही.वर आल्या आणि “किरण माने हा माणूस म्हणून अतिशय भला आहे. काडीचंही गैरवर्तन नाही. आमच्यावर मुलीसारखी माया करतात ते..” असं बोलू लागल्या आणि प्रद्युम्न मित्रमंडळींवर मोठ्ठा बॉम्ब पडला. मेंदूवर आघात झाला.
तन्मय म्हणाला, “च्यायला एक प्लॅन सक्सेसफुल होईना झालाय. आधी म्हणाले व्यावसायिक कारणामुळे काढलंय. नंतर म्हणाले महिलांशी गैरवर्तन. नंतर म्हणाले टॉन्टिंग.. आणि आता ते ही फसलं…” …तन्मय हे बोलत असतानाच प्रद्युम्न चिन्मयच्या अंगावर कोसळला. चिन्मय चेंगरलाच. कसातरी त्याला उचलुन हॉस्पीटलमध्ये आणला… आणि…”
डॉ. प्रसन्न सहस्त्रबुद्धे गोड माणूस! ते प्रसन्न हसले. स्वत:शी म्हणाले “द्वेष हे सगळ्या अस्वस्थतेचं, चिंतेचं आणि त्यातून येणार्या विकृतीचं मूळ आहे. जातीद्वेष असो… धर्मद्वेष असो… वा व्यक्तीद्वेष असो… त्या विकृतीतून सुरू होते अर्वाच्य शिवीगाळ. आणि याचं टोक म्हणजे कपट कारस्थान. आणि याचा शेवट वैफल्य… उदासिनता.. मानसिक आरोग्याची हानी !! द्वेष करणं’ म्हणजे स्वत: विष पिणं आणि आपल्या शत्रूनं मरावं अशी अपेक्षा करणं !!!”
…शुद्धीवर आलेल्या प्रद्युम्नच्या डोळ्यांत पाणी आलं… “तसा बरा ॲक्टर आहे किरण माने… पण…” पुन्हा मनात ‘त्या’ विचारांनी थैमान घातले… पुन्हा तो ओरडू लागला… डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली…..’ अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी शेअर केली.
महत्त्वाच्या बातम्या :
माझ्यावर आरोप करणारी महीला कलाकार भाजपशी संबंधीत; किरण मानेंनी उघड केले कनेक्शन
लता मंगेशकर यांची तब्येत आणखी बिघडली, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती
मानेंना मोठं व्हायचय म्हणून वाद ते निर्माण करताहेत; शिवसेनेचे किरण मानेंवर गंभीर आरोप