राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी सम्राट पृथ्वीराज हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर आपली चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आता आपण भारतीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहत आहोत. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिकेत असलेला पृथ्वीराज या चित्रपटाला त्यांनी जागतिक दर्जाचा चित्रपट म्हटले आहे.
आरएसएसच्या उच्च पदाधिकाऱ्यांसोबत चित्रपट पाहिल्यानंतर भागवत म्हणाले की, हा वस्तुस्थितीवर आधारित आहे. हा चित्रपट जो संदेश देतो त्याची आज देशाला गरज आहे. आतापर्यंत आपण इतरांनी लिहिलेला इतिहास वाचत होतो. आता आपण आपल्या इतिहासाकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहत आहोत.
तसेच म्हणाले, पृथ्वीराज चौहान, मोहम्मद घोरी यांच्या लढाईबद्दल आपण आधी वाचलं आहे, पण ते कोणीतरी परक्यानं लिहिलं होतं. सध्या आपण भारतीय भाषेत लिहिलेलं आणि चित्रित केलेलं पहिल्यांदाच पाहतोय. आता आपण भारताचा इतिहास भारतीय नजरेने पाहत आहोत. हा इतिहास समजून घेण्याची संधी देशातील नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे देशाच्या भविष्यावर याचा चांगला परिणाम होईल.
माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे संघाची उपकंपनी असलेल्या संस्कार भारतीशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपशासित राज्ये असणारे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड येथे याआधीच हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1532813715795476485?t=opH_59tq97W6pZ3G4FgxSA&s=19
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. स्क्रिनिंग दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी पीरियड ड्रामाच्या कलाकार आणि क्रूचे कौतुक केले होते.
भारताच्या सांस्कृतिक युद्धांचे चित्रण करणारा हा चित्रपट इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने पाहिल्याचे त्यांनी सांगितले. अमित शाह पुढे म्हणाले की, १३ वर्षांनंतर मी कुटुंबासह थिएटरमध्ये चित्रपट पाहत आहे. दिल्लीतील एका सिनेमागृहात त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह हा चित्रपट पाहिला असे त्यांनी सांगितले.