सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारी टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां पुन्हा नव्या वादात सापडली आहे. शमीवर तिने काही वर्षांपासून गंभीर आरोप केले होते, मात्र यावेळी ती वेगळ्याच वादात सापडली आहे.
हसीन जहां यावेळी स्वतः च वादात सापडली आहे. तिच्यावर चक्क तिच्या आई-वडिलांनीच गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर, हसीन जहांचे वडील मोहम्मद हुसेन यांनी तिला संपत्तीमधून बेदखल केल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे सध्या हसीन जहां प्रचंड चर्चेत आली आहे.
हसीन जहां हिच्या आई-वडिलांनी तिच्यावर छळ करणे, संपत्तीचा अवैध ताबा घेणे याबाबत कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सोनातोर पारा सुरीमध्ये राहणाऱ्या हसीनच्या आई-वडिलांनी हसीनसह तिचा मित्र सुब्रत मुखर्जी, 2 कर्मचारी आणि त्यांची सून जुही हिच्यावरही आरोप दाखल केले आहेत.
या प्रकरणात हसीनच्या वडिलांनी तिला एक नोटीसही पाठवली असून, ती नोटीस त्यांनी सार्वजनिक केली आहे. मोहम्मद हुसेन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एकलुता एक मुलगा तारिक परवेझ उर्फ बंटीचा गेल्या वर्षी कोव्हिडमुळे मृत्यू झाला. बंटीच्या मृत्यूनंतर हसील जहांनं त्याच्या सर्व संपत्तीवर कब्जा केला.
हसीनच्या वडिलांनी सांगितले की, हसीनने तिच्या भावाच्या नावावर असलेले 2 ट्रक, कार, दुचाकी, हॉटेल, पेट्रोल पंप, कोळशाची खाण आणि लाखो रुपयांच्या विमा पॉलिसीवर कब्जा केला आहे. तसेच सांगितले की, तिच्यावर छळ करणे आणि संपत्तीचा अवैध ताबा घेण्याबाबत कोलकत्ता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
हुसेन यांनी त्यांचे वकील अमित कुमार यांच्या हवाल्यानं दावा केला आहे की, ‘मुस्लिम पर्सनल लॉच्या नियमानुसार वडील जिवंत असताना मृत मुलाच्या संपत्तीचा हक्क हा विवाहित बहिणीला नाही तर त्यांना मिळतो. एवढेच नाही तर हसीनच्या आईने हसीनला संपत्तीचा ताबा मागितल्यावर तिनं त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली.