भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देहू दर्शनाचं निमंत्रण दिलं होतं. आता मोदी लवकरच देहूत दर्शनासाठी येणार आहेत. त्यासाठी भाजपकडून अनेक ठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावले आहेत. याच बॅनरवरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
नरेंद्र मोदी देहू दौरा लवकरच करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी ठिकठिकाणी बॅनर लावले गेले आहेत. बॅनरवरील फोटोंची सध्या चर्चा होत आहे. बॅनरवर ज्या पद्धतीने फोटोबाजी करण्यात आली त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला, असे राष्ट्रवादी कडून सांगण्यात येत आहे.
वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नसताना मोदींचा फोटो मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, असा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या बॅनरचे काही फोटो ट्विट करत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपने वारकरी संप्रदायाची माफी मागावी,अशी मागणी राष्ट्रवादी कडून केली जात आहे.
https://twitter.com/ravikantvarpe/status/1535637931037233154?t=mRTiD5BHj7KNwjd6NyvLog&s=19
माहितीनुसार, १४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी देहू संस्थानच्या वतीने खास डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणं देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी येत आहेत म्हटल्यावर त्यांच्या सुरक्षेचीही पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी आजपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोनाने दोन वर्षाचा ब्रेक लावल्यानंतर यंदा पायी वारी निघत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.