पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते सोडले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदामुळे नॅशनल पार्कमध्ये काही फोटोही काढले. तृणमूल काँग्रेसने या प्रसंगाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. या फोटोमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान मोदी ज्या कॅमेऱ्याने फोटो क्लिक करत आहेत त्याची लेन्स झाकलेली आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी मोदींचा या चित्त्यांचा फोटो काढतानाचा एक फोटो शेअर करत खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्याचं कव्हर न काढताच फोटो काढले, असा दावा या नेत्याने केला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, सगळी आकडेवारी झाकून ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे. पण कॅमेऱ्याची लेन्सही झाकून ठेवणं म्हणजे किती दूरदृष्टीचं काम आहे.
मात्र आता भाजपने या व्हायरल फोटो मागील सत्य सांगितले आहे. भाजपने व्हायरल होणाऱ्या फोटोला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा नेते सुकांता मुजुमदार यांनी हा कॅमेरा निकॉनचा असून त्यावरचं कव्हर कॅननचं असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट देखील केलं आहे.
मुजुमदार आपल्या ट्वीटमध्ये ममता बॅनर्जींना टॅग करत म्हणतात की, तृणमूलचे खासदार निकॉनच्या कॅमेऱ्यावर कॅननचं कव्हर असणारा एडिटेड फोटो शेअर करत आहे. खोटा प्रचार करण्याचा हा खूपच वाईट प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जींनी किमान थोडी माहिती असणाऱ्यांना कामावर ठेवावं.
https://twitter.com/DrSukantaBJP/status/1571176542788788225?t=5LqLk0XVKP6AIrMEG9oxLA&s=19
या सगळ्या प्रकारानंतर तृणमूलचे खासदार जवाहर यांनी लगेचच ट्वीट डिलीट केलं आहे. मात्र तोवर हे सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झालं आहे. मात्र, भाजपने स्पष्टीकरण दिल्यामुळे आता मोदी फोटोग्राफी करतानाच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली असून, कॅमेराच्या लेन्सवर कव्हर असल्याचं भासवण्यात आलं हे सत्य समोर आलं आहे.
https://twitter.com/DeshiProfessor/status/1571159182921043974?t=xMC-OMOHvM3s_3GbrU2Y2g&s=19
दरम्यान, यावेळी मोदींनी वापरलेल्या कॅमेऱ्याच्या किंमतीबाबत देखील चर्चा सुरू आहे. डीएसएलआर कॅमेऱ्याच्या किमती ५० हजार ते एक लाखांच्या घरात आहेत. पण लेन्सच्या किमती कॅमेऱ्यापेक्षाही खूप जास्त आहे. साधारण एक लाख ते ५ लाखांच्या घरात या लेन्सच्या किमती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही लेन्सही साधारण याच दराची असणार आहे, असे बोलले जात आहे.