Share

मोदी करणार ‘गुजरात टायटन्स’ ला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण

आयपीएल 2022 मधील नवीन संघ गुजरात टायटन्स आता आयपीएलची फायनल खेळणार आहे. ही फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. रविवारी 29 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरूद्ध त्यांची फायनल असणार आहे. या फायनलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हजेरी लावणार अशी चर्चा आहे.

गुजरात टायटन्स आपल्या होम ग्राऊंडवर तब्बल 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या समोर आपली पहिली वहिली आयपीएल फायनल खेळणार आहे. माहितीनुसार, हा सामना होण्यापूर्वी येथे सांगता सोहळा पार पडणार आहे. यंदाचा आयपीएलचा हा सांगता समारंभ भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर आधारलेला असणार आहे.

या सोहळ्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेता रणवीर सिंह, ए.आर. रेहमान, उर्वशी रौतेला देखील परफॉर्म करण्याची शक्यता आहे. आमिर खान देखील आपल्या नव्या ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलर यावेळी प्रदर्शित करणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आयपीएलमध्ये हजर राहणार असे बोलले जात असले तरी, याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सध्या नरेंद्र मोदी गुजरात येथे असून, गृहमंत्री शाह देखील गुजरात दौऱ्यावरच आहेत, यामुळे ते फायनल सामना पाहण्यासाठी येणार असे बोलले जात आहे.

दरम्यान, अहमदाबादमध्ये शुक्रवार ते रविवार राजकीय आणि क्रीडा कार्यक्रम आहेत. अशा स्थितीत ६,००० हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने राज्य राखीव पोलीस, जलद कृती दल, आणि इतर एजन्सींनाही सुरक्षा व्यवस्थेसाठी सामील केले आहे.

आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच हंगामात अंतिम फेरी गाठली आहे. पण हार्दिक पांड्या काही पहिलीच आयपीएल फायनल खेळत नाही. तो याआधी पण चार वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. महत्वाचं म्हणजे चारही फायनल त्याने जिंकल्या आहेत.

इतर खेळ

Join WhatsApp

Join Now