सध्या युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू आहे. यामध्ये युक्रेनमधील अनेक ठिकाणं उध्वस्त होत आहेत. अशातच, युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. यावरून भारतीय राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
गुरुवार पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी, त्यांनी युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत.
तसेच म्हणाले, मोदी सरकारचे चार मंत्री तिकडे गेले आहेत. परंतु एकही मंत्री युक्रेन किंवा रशियात गेले नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधक चर्चेला तयार होतो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडले नाही, असा आरोप शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.
यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. म्हणाले, आपलं सरकार चांगलं काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता येते, जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ मी पाहिलं नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचं असतं आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते. पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे, अशा शब्दात पवारांनी फडणवीस यांना टोला लगावला.
सध्या युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकून बसले आहेत. त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकाराने ‘ऑपरेशन गंगा’ हाती घेतलं आहे. आत्तापर्यंत सहा हजार विद्यार्थ्यांना भारतात परत आणल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अनेक विद्यार्थी अद्याप अडकले आहेत. तिथे त्यांचे हाल होत आहेत, तर काहीजण हल्ल्याचे शिकार झाले आहेत.