देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती असेल असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तुम्हाला देखील त्यांची संपत्ती किती हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असेल. तर, नुकतीच पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधानांची संपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे.
देशातील काळे पैसे परत आणण्यासाठी मोदींनी नोटाबंदीसारखा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने याही वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांची सध्याची संपत्ती किती याची माहिती जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२पर्यंत नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये असल्याचे यात जाहीर करण्यात आलेले आहे. यात गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत थोडी वाढ झाल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालकत्ता नसल्याचेही समोर आले आहे. गुजरातमध्ये गांधीनगर येथे असलेली मोदींच्या वाट्याची असलेली जमीन त्यांनी दान केली आहे. या जमिनीची किंमत १.१ कोटी इतकी होती. सध्या त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीत गेल्या वर्षीपेक्षा २६ लाख १३ हजारांनी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
त्यात, त्यांनी गेल्या वर्षात एक जमीन दान केल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन होती. ही जमीन त्यांनी दान केली आहे. २००२ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही जमीन खरेदी केली होती.
माहितीनुसार, या जमिनीवर अजून ३ जणांना मालकी हक्क होता. जमिनीपैकी २५ टक्क्यांवर मोदींचा अधिकार होता. ती जमीन त्यांनी दान केली आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण ३५ हजार २५० रुपयांची रोख रक्कम आहे.
पोस्टात नरेंद्र मोदी यांच्या नावे ९ लाख ५ हजार १०५ रुपयांचे सेव्हिंग सर्टिफिकेट जमा आहेत. मोदी यांच्या नावाने १ लाख ७९ हजार रुपयांना जीवन विमाही आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वताचे कोणतेही वाहन नाही. त्यांनी कुठल्याही शेअर्स, बॉण्ड्स किंवा म्युचअल फंडमध्ये पैसे गुंतवलेले नाहीत. त्यांच्याकडे फक्त ४अंगठ्या असून, त्यांची किंमत १.७३ लाख रुपये इतकी आहे.