सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रात संवाद दौरे सुरू केले आहेत.
काल अमित ठाकरे यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान, दादर ते अंबरनाथ असा लोकलने प्रवास केला. अंबरनाथ येथील रोटरी सभागृह येथील विद्यार्थी तसेच पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी शिवमंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, गृहमंत्री पद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ, पण ते देत नाहीत ना, असा मिश्किल टोला लगावला.
तसेच, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत, वर्षानुवर्षे असलेल्या त्या कायम असल्याची नाराजी व्यक्त केली. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्याबाबतचा अहवाल मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना सादर केला जाणार असल्याचे अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेची पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी अमित ठाकरे हे सध्या राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील आपली शिवसेना बळकट करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत.
दरम्यान शिवसेनेने संवाद यात्रा सुरू केली आहे. नुकतेच नाशिकच्या मनमाड येथे आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. तर, काल औरंगाबाद येथे त्यांचा दौरा होता. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.