मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत घेतलेल्या सभेनंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिस महासंचालकांची पत्रकार परिषद आज पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादेच्या सीटी चौक पोलिस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सभेच्या आयोजकांनाही पोलिसांनी दणका देत गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे चांगलेच भडकले आहे. ‘जर आम्हाला असं अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर राज्य सरकारनं तयार राहावं. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना देशपांडे म्हणाले, आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, असंही ते म्हणाले. तसेच ‘आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही,’ असं म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्ती दिल्या होत्या ज्याचे पालन राज ठाकरेंना करायचे होते. पण यातल्या काही अटींचा भंग तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात?
राज ठाकरेंना अटक होणार का? औरंगाबाद पोलीस पुढं काय पाऊले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनसेच्या अनेक नेत्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई या बड्या नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.