Shivsena : शिवसेना नेते अरविंद सावंतांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसे आक्रमक; मुंबईत राड्यावर राडे

सध्या राजकीय वर्तुळात प्रभादेवीत झालेल्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या राड्याची चर्चा आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद शांत झाला.

मात्र, सदर प्रकरणानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तिथे अरविंद सावंत यांची एका पोलिसांसोबत बाचाबाची झाली. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, शून्य कामगिरी पण कार्यकर्त्यांसमोर चंपूगिरी करणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. सणासुदीच्या काळात कुठेही गैरप्रकार होऊ नये, म्हणून सतत दक्ष असणारे आपले मुंबईचे पोलीस पावसापाण्यात, उन्हात बाप्पाचा सण निर्विघ्नपणे पार पाडणारे हे पोलीस. गेले १० दिवस ते अहोरात्र मेहनत करत आहेत.

परंतु तुम्ही त्यांना बोट दाखवत आहात. पोलिसांचा अपमान करणाऱ्या बेशरम खासदाराचा मी निषेध करतो. पोलिसांचा हा अपमान मनसे सहन करणार नाही. अरविंद सावंतांना तत्काळ अटक करा. अशी मागणी अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, झालेल्या राड्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर अरविंद सावंत म्हणाले होते की, ठाकरे सरकारनं गुंडांचा बंदोबस्त केला. त्यांच्या कारकिर्दीत एकही दंगा घडला नाही. कुणाची हिंमत झाली नाही. आता राज्यकर्ते बोलत आहेत.

पुढे म्हणाले, एक म्हणतो, चुन चुन के मारेंगे, दुसरा म्हणतो तंगड्या तोडीन, तिसरा आमदार गोळीबार करतो. चौथी महिला खासदार पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांशीच गैरवर्तन करते. पण या विरोधात गुन्हा दाखल होत नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असे अरविंद सावंत म्हणाले होते.