Share

Shinde group : शिंदे गटात सामील झालेल्या आमदार सोनवणेंना मतदारांचा दणका, अस्तित्व टिकवणंही झालं मुश्किल

शिवसेनेची साथ सोडत अनेक आमदार खासदार शिंदे गटात गेले, मात्र काहींची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाल्याचं चित्र दिसत आहे. कारण अनेक आमदार, खासदार शिवसेनेला सोडून शिंदे गटात तर गेले, मात्र त्यांचे मतदार त्यांच्यासोबत जात नाहीत, ही स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

असाच काहीसा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत दोन गट पडले आहेत. बंडखोर गटातल्या आमदाराला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे. फक्त बंडखोर गटच नाही, तर भाजपलाही इथे फटका बसला आहे.

याठिकाणी राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याची चर्चा आहे. या बंडखोर आमदारांवर आधीच आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे, त्यात ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी साथ दिली नसल्याचं दिसून आलंय.

ठाकरेंना सोडणाऱ्या आमदार लता सोनवणे यांच्या चोपडा मतदारसंघात असाच प्रकार बघायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला अनपेक्षित असा निकाल चोपडा मतदारसंघात लागला. लता सोनवणे आमदार असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाला १३ पैकी फक्त तीन ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली आहे.

एकीकडे आमदार लता सोनवणे शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे तर दुसरीकडे त्यांचे जात पडताळणी अवैध बाबत उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे लता सोनवणे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. यामुळे दोन्ही गोष्टींचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीचंद्र वळवी यांनी मिळवला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या जगदीश वळवी यांनी कमबॅक केला. याआधी लता सोनवणे यांनी २०१९ ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता लता सोनवणे यांना आपली ताकद वाढवण्यासाठी आणखी बरीच मेहनत घ्यायला लागणार आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now