आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेसोबत बंड करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. असे असताना कधीही राजकारणात सक्रिय नसणारी किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सोबत असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे फलक पाचोरा शहरात ठिकठिकाणी झळकले आहेत. वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटील यांना पाठिंबा न देता उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याने कालपासून चर्चा सुरू आहेत.
वैशाली सूर्यवंशी यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, कट्टर शिवसैनिक स्वर्गीय माजी आमदार आर. ओ. पाटील यांची वैशाली सूर्यवंशी ही कन्या आहे. तर, आर. ओ. पाटील हे किशोर पाटील यांचे काका असून आर. ओ. पाटील यांच्यामुळेच किशोर पाटील राजकारणात आले आणि आमदार होवून आज या पदापर्यंत पोहचले आहेत.
किशोर पाटील शिवसेनेत असताना आमदार झाले. काही दिवसांपूर्वीच बंडखोरी करत किशोर पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यावरून शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे.
एकाच कुटुंबातील असलेल्या वैशाली सूर्यवंशी या बहिणीने भाऊ आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा न दर्शवता उद्धव ठाकरे यांना समर्थन देत वेगळी वाट निवडल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आली आहे. आता आगामी काळात किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी असा सामना पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू आहे.
निर्मल सीड्स नावाने असलेला उद्योग हा वैशाली सूर्यवंशी या मोठ्या जबाबदारीने सांभाळत आहेत. आता आर. ओ. पाटील यांच्यानंतर त्यांच्या कन्या वैशाली पाटील या राजकारणात सक्रिय झाल्याने आगामी काळात निवडणुकांमध्ये तरुण चेहरा म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






