शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच एक कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे देखील शिंदेंच्या गटात सामील झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र त्यांच्याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे.
एक कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची ओळख आहे. मात्र, बांगर हे फुटले आणि शिंदेंच्या गटात सामील झाले अशी बातमी समोर आली होती. त्यामुळे बांगर यांच्या मतदारसंघात व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
मात्र, बांगर यांच्या बाबतीतली ही अफवा असल्याचे आता समोर आले आहे. संतोष बांगर यांनी स्वतः याबाबत खुलासा केला. त्यांनी आपण मुंबईतच आहोत, आणि लवकरच हिंगोलीत येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे.
बांगर यांच्या खुलाशानंतर, त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल समर्थकांकडून आणि शिवसैनिकांकडून त्यांचा सत्कार हिंगोलीच्या संपर्क कार्यालयात करण्यात येणार आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संतोष बांगर हिंगोलीत येण्यासाठी निघालेच होते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना तातडीने पुन्हा मुंबईत बोलावून घेतल्याची माहिती मिळत आहे. आमदार बांगर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मातोश्री किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्याला ते जाब विचारतात असे देखील अनेकदा पाहायला मिळाले.
तीन दिवसांपासून मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या संदर्भात एक वृत्त धडकले होते, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी संतोष बांगर देखील गुवाहाटीत गेले आहेत. मात्र आता संतोष बांगर यांनी स्वतः आपण ठाकरेंसोबत आहोत अशी माहिती दिली त्यामुळे शिवसेनेच्या गोटात थोडा तरी दिलासा मिळाला आहे.