Share

प्रचंड गदारोळानंतरही मिटकरींचा माफी मागण्यास नकार; उलट म्हणाले, मी कशाला माफी मागू?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविषयी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ब्राम्हण महासंघाकडून आज आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलं. यावेळी धक्काबुक्की देखील पाहायला मिळाली.

यावेळी अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली. ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला या वेळेस मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये अधिक गोंधळ निर्माण होऊ नाही यासाठी कार्यालयाच्या बाहेर मोठा फौजफाटा देखील पाहायला मिळाला. तसेच, गुरुजींच्या वेशात आलेले कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचे निदर्शनास आले.

अमोल मिटकरी यांच्याविरोधात ब्राम्हण समाजाकडून प्रचंड संताप व्यक्त होण्याचं कारण म्हणजे, अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली आहे, असा आरोप ब्राम्हण महासंघाकडून होत आहे.

अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हास्य आवरले नाही. या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, त्यानंतर ब्राम्हण समाजाकडून प्रचंड संताप व्यक्त झाला.

ब्राम्हण महासंघाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली म्हणाले, मी कुठल्याही समाजाचा उल्लेख करत भाष्य केले नाही, कुठल्याही समाजाबद्दल अपशब्द वापरला नाही. मग मी माफी कशाला मागू. तसेच कुठलेही चुकीचे विधान मी केलेले नाही, असे मिटकरी म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now