शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. आता त्यांच्या अपघाताबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामुळे विनायक मेटे यांची प्रकृती गंभीर होती. तसेच, विनायक मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचं निधन झालं.
आता त्यांच्या अपघाताबाबत गंभीर माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अपघातानंतर जवळपास १ तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नव्हती. मदतीसाठी १०० नंबर वरती फोन केला मात्र या नंबरवरील फोन देखील उचलला गेला नाही. शिवाय मदतीसाठी इतर गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणीही गाडी थांबवत नव्हतं.
अपघात झाला त्यावेळी मेटे यांच्यासोबत त्यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील होते. त्यांनी या अपघाताबद्दल दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकने कट मारल्याने बीडकडून मुंबईकडे येताना मुंबई- एक्सप्रेसवर हा अपघात झाला. त्यानंतर एक तास मदत मिळाली नाही. १०० नंबर वरती फोन केला मात्र कोणी घेतला नाही.
तसेच कदम म्हणाले, मदतीसाठी अनेकदा विनवणी करत होतो, मात्र कोणीही गाडी थांबवली नाही. विनायक मेटे यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मी मदतीसाठी रोडवर झोपलो होतो, तेव्हा कुठे एका व्यक्तीने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली.
अपघात झाल्यानंतर १ तासाने रुग्णवाहिका त्या ठिकाणी आली. अपघात झाल्यानंतर मेटे शुद्धीत होते, मी त्यांच्याशी संवाद देखील साधला होता. त्यांना त्यावेळी बोलता येत होते. असे कदम यांनी सांगितले. तसेच म्हणाले, जेव्हा मदतीसाठी १००नंबर वरती फोन केला तेव्हा कोणते आमदार आम्हाला माहिती नाही अशी उत्तरं मिळाली, ते कर्मचारी पूर्णपणे झोपेत होते असे कदम म्हणाले.