महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. काल त्यांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या घोषणा केल्या. नुकतीच काल मुख्यमंत्र्यांची प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
तसेच, सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बैठक झाल्यानंतर या गोष्टींची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे.
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्षापासून पूर येत आहे. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे पूराचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
पाणी वाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही म्हणून पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यात येणार आहे. तसेच, बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार असून या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेने सहमती दर्शवली असून या प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आता या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला जागतिक बँक मदत करणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरसदृश्य भागातील लोकांना तसेच मराठवाड्यातील दुष्काळप्रभावित भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.