गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचे सावट होते. मात्र, यावर्षी कोरोना आटोक्यात आला आहे, त्यामुळे यावर्षीचे सण उत्सव अगदी जल्लोषात साजरे केले जात आहेत. आज गणपतीचे आगमन झाले, सर्वांनी आनंदात गणपतीचे स्वागत केले. घरोघरी गणेश बाप्पाची स्थापना करण्यात आली.
मराठी कलाकारांनी देखील आपल्या घरोघरी गणपतीची स्थापना केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी फोटो देखील पोस्ट केले आहेत. सकाळीच गणपतीची पूजाअर्चा झाल्यावर सुबोध भावे ने सोशल मीडियावर गणपती आणि त्याच्या भोवती केलेली आरास यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुबोधनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की ‘श्री गणेशाचं आगमन आज झालं. सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या घरच्या देखाव्याची कल्पना आणि सादरीकरण या वर्षीही मुलांनी केलं.’आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी’ अशी कल्पना करून गणपती सजवला आहे.
तसेच लिहिले, निसर्गाचा सांभाळ केला तर आनंदी पृथ्वी आणि निसर्गाचा नाश केला तर दुःखी पृथ्वी. नवीन पिढीला निसर्ग जपण्याचं महत्त्व कळतंय. निसर्ग जपण्याची बुध्दी आणि शक्ती आपल्या अंगी येवो हीच गणराया चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.
अभिनेता स्वप्निल जोशीने देखील गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. मोठ्या जल्लोषात त्याने बाप्पांचे स्वागत केले. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याने आपला फॅमिली फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री वीणा जगताप हिच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो असे कॅप्शन देत तिने फोटो शेअर केले आहेत. तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेले आदेश बांधेकर यांनी देखील आपल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे.