नुकतीच सांगली जिल्ह्याला हादरवणारी बातमी समोर आली आहे. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत सांगलीतील एका शासकीय कंत्राटदाराचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला. त्यानंतर पोलिसांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले.
माणिकराव विठ्ठल पाटील यांचे अपहरण झाल्यानंतर कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी माणिकराव यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. अखेर त्यांच्या मुलाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार माणिकराव पाटील शासनाची मोठी कामे घेत असतात.
याचबरोबर दि. १३ रोजी रात्रीच्या सुमारास ते तुंग येथे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून गेले होते. मात्र रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांना जमीन दाखवण्यासाठी बोलावून घेत अपहरण केल्याच बोललं जातं आहे.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तातडीने शोधाशोध सुरू केली. सुरुवातीलाच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात एका ठिकाणाहून आलिशान मोटार जाताना दिसली.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास वेगाने सुरू केला. आणि अखेर कोडिग्रीजवळ बेवारस स्थितीत गाडी सापडली. मात्र माणिकराव यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अपहरणामागील गूढ वाढलं. धक्कादायक बाब म्हणजे, बुधवारी सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावच्या हद्दीत नदी पात्रात एक मृतदेह आढळला.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हा मृतदेह पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घातपताची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.