मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची खिल्ली उडवली आहे. तसेच शिंदे यांचे भाषण अपेक्षेइतके रंगले नाही अशी टीका नेटकऱ्यांकडून सध्या केली जात आहे.
काल बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. एवढी गर्दी होती की, पूर्ण नियोजन करून देखील लोकांना बसण्यासाठी जागा नव्हती. काहींना रस्त्याच्या बाजूला उभा राहून एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकावं लागलं.
काल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याचे भाषण संपत आल्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांचं भाषण तब्बल दीड तास चालले. मात्र हे भाषण अपेक्षेइतके रंगले नाही, अशी टीका विरोधकांकडून आता होत आहे.
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी याच मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. अतुल लोंढे यांनी ट्विट केलं आहे. लिहिले की, ‘BKC मध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा चांगले आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! पैसा खर्चून गर्दी आणली, भाषणही लिहून आणले पण वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही हेच BKC मध्ये दिसले.’
तसेच अतुल लोंढे म्हणाले, BKC तील दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSS चे प्रवक्ते बनून RSS ने देश कसा घडवला याचे ज्ञान वाटत आहेत, असे म्हणाले. तसेच, ‘ED च्या भीतीपायी तुम्ही गद्दारी केली त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही पण काहीही बोलून मुख्यमंत्रीपदाची गरिमा घालवू नका’ अशी खोचक टीका केली.
BKC मध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा चांगले आहे.
त्या तुलनेत मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे!पैसा खर्चून गर्दी आणली, भाषणही लिहून आणले पण वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही हेच BKC मध्ये दिसले.
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) October 5, 2022
तसेच म्हणाले, BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा लोटांगण सोहळा सुरु आहे. अतुल लोंढे यांनी केलेल्या ट्विट ची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात पाहावं लागेल.
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना सभेसाठी जमलेले कार्यकर्ते उठून जात असल्याचा प्रकार बीकेसी मैदानावर पाहायला मिळाला. मेळाव्यासाठी फार दुरून लोक आले होते. काहीजण काल दुपारीच मैदानावर येऊन थांबले होते.
त्यात शिंदे गटाचा मेळावा फार लांबला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री आठच्या सुमारास भाषणाला सुरुवात केली. शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी एवढी जमली की बसायला देखील जागा नव्हती, काहीजण रस्त्याच्या बाजूला उभा राहून भाषण ऐकत होते, मात्र जे मोठा प्रवास करून मेळाव्यात गेले होते ते शिंदे यांचे भाषण होण्यापूर्वीच परतल्याचं दिसलं.