मलईदार खाती राहणार भाजपकडे, मंत्रीपदाचे वाटप झाले फायनल; वाचा शिंदे गटाला किती मंत्रीपदे मिळणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्ली दौरा केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतली. ही भेट गुप्त राहण्यासाठी अनेक खोट्या बातम्या देखील समोर आल्या. आता या भेटीत नेमकं काय झालं याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा गुप्त दौरा केला, याची प्रचंड चर्चा आहे. या दौऱ्यात शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा केल्याचं समजत आहे. या भेटीत सर्व मलाईदार खाती भाजपकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम यासारख्या वजनदार खात्यांची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर राहण्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे गटातील आमदारांना सगळं दिलं, तर भाजपच्या आमदारांनी काय करायचं? असा थेट सवाल अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना विचारल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी भाजपश्रेष्ठींशी चर्चा करुन गुरुवारी पहाटे ते मुंबईला परत आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंचा दौरा ऑन पेपर येऊ नये, याची पुरेपूर दक्षताही भाजपने घेतल्याची माहिती आहे.

या बैठकीत शिंदे आणि शाह यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटात ६५-३५ असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. चार आमदारांमागे एक मंत्रिपद या हिशोबाने शिंदे गटातील ५० आमदारांमागे १३ मंत्रिपदांची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हा आकडा १४ च्या पुढे जाऊ शकतो. तर भाजपकडे २५ पेक्षा अधिक मंत्रिपदं राहण्याची शक्यता आहे. शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर या सर्व शक्यता बोलल्या जात आहेत. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच योग्य ती माहिती समोर येईल.