दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पुजा भट्ट (Mahesh Bhatt And Pooja Bhatt) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. दोघेही त्यांच्या कामासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत येत असतात. आताही ते दोघे पुन्हा एकदा माध्यमात चर्चेत आले आहेत. नुकतीच पुण्यात समर्पण नावाचे व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्यात आले. तर एकेकाळी दारूच्या आहारी गेलेल्या बापलेकीच्या म्हणजेच महेश भट्ट आणि पुजा भट्ट यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
‘समर्पण’ हे भारतातील पहिले पुनर्वसन केंद्र आहे जे व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य आणि आरोग्य सेवा देते. तसेच मानसिक आरोग्य आणि व्यसनाचा सामना करणाऱ्यांच्या उपचारासाठी ‘समर्पण’ हा आशेचा किरण आहे. या व्यसनमुक्ती केंद्राच्या शुभारंभासाठी महेश भट्ट आणि पूजा भट्ट पुण्यात उपस्थित होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बलदोटा समूहाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ए. बलदोटा उपस्थित होते. या तिघांच्या हस्ते रिबन कापून समर्पण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना महेश भट्ट यांनी म्हटले की, ‘समर्पण हा एक आशेचा किरण आहे. यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही मला एकाकीपणा जाणवत होता. त्यामुळेच मला दारूचे व्यसन लागले. पण जेव्हा माझी दुसरी मुलगी शाहिनचा जन्म झाला तेव्हा मी दारू पिऊन घरी आलो होतो. मला आठवतंय की, मी माझ्या मुलीला माझ्या हातात घेतलं होतं. तेव्हा तिने तिचे तोंड फिरवले. कारण माझ्या तोंडाला वास येत होता. त्या एका क्षणाने माझे आयुष्यच बदलून टाकले. तेव्हापासून आज ३४ वर्ष झाली, मी दारूला हात लावला नाही’.
महेश भट्ट यांनी पुढे सांगितले की, ‘जेव्हा मी डॅडी चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो तेव्हा मला वाटलं की, मी दारू प्यावी आणि कोणाला कळणार नाही. पण तेवढ्यात मला माझ्या ह्रदयातून आवाज आला की, तु जगाशी, त्या लहान मुलीशी खोटं बोलशील. पण स्वतःशी खोटं कसं बोलणार? त्यामुळे दारुच्या व्यसनेतून मुक्त होण्यासाठी स्वतःला पुढाकार घ्यावं लागणार. दृढ इच्छा असेल तर आपण यामधून बाहेर पडू शकतो. मला आणि पूजाला या कार्यक्रमाला बोलावण्यात आले कारण आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून नाही तर आम्ही या दारूच्या व्यसनातून बाहेर पडलो आहोत. ‘समर्पण’सारखी सुविधा सुरु केल्याबद्दल मी यासंबंधित सर्वांना शुभेच्छा देतो’.
यावेळी बोलताना पूजा भट्टने म्हटले की, ‘साधारणपणे एक अभिनेत्री, निर्माती आणि कार्यकर्ती म्हणून माझी ओळख करून दिली जाते. पण मला वाटतं की, पूजा भट्ट दारूच्या व्यसनातून सावरली, असे लोकांनी म्हणावं. लोक मला डॅडी या चित्रपटामुळे ओळखतात. या चित्रपटात मी एका मुलीची भूमिका साकारली होती जिचे वडिल मद्यपी असतात. पण खऱ्या आयुष्यात माझे पिता महेश भट्ट यांच्या एका मेसेजमुळे माझे आयुष्य बदलले. मी दारूच्या व्यसनी गेले होते. एके दिवशी महेश भट्ट यांनी मला मेसेज केला की, जर तु माझ्यावर प्रेम करत असशील तर पहिल्यांदा तुला स्वतःवर प्रेम करावे लागणार. त्या दिवशी मी खूपच भावूक झाले आणि दारू सोडली’.
पूजाने पुढे म्हटले की, ‘मला दारू पिण्याची सवय होती हे मी मान्य केले. पण लोक तसे करत नाहीत. कोरोना काळात मारहाण, एकमेकांचे अपमान करणे, मानसिक आरोग्यासंबंधित तक्रारी, आत्महत्येचे प्रकरण वाढले आहेत. अशा मानसिक दबावाखाली राहणाऱ्या लोकांसाठी ‘समर्पण’सारख्या केंद्रांची आवश्यकता आहे. तसेच जर तुम्ही व्यसनी असाल तर तुम्ही दोषी आहात, ही भावना मनातून काढून टाकावी. दारूचे व्यसन असणे, हे एकप्रकारचे आजार आहे आणि यावर कोणतीही लाज न बाळगता इतर आजाराप्रमाणे यावरही उपचार होणे गरजेचे आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर
‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’; महेश टिळेकरांचा मराठी कलाकारांना टोला
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर