Share

धार्मिक स्थळापासून २०० मीटरपर्यंत लाऊडस्पीकरला बंदी; सोबतच आणखी ‘हे’ निर्बंध

महाराष्ट्र राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा भोंगा आणि हनुमान चालीसा या मुद्यावरुन राज्य सरकारला सुनावलं, आणि तातडीने निर्णय घेण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर आता ठाणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळापासून 200 मीटरपर्यंत लाऊडस्पीकर वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शहरातील ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदारांना ध्वनिक्षेपक तसेच त्यासंबंधीचे साहित्य खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची वैयक्तिक माहिती घेऊन जवळील पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवाय, कोणताही अनुसूचित प्रकार घडू नाही यासाठी, कोणत्याही धार्मिक स्थळापासून 200 मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव, घोषणाबाजी, गायन, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर, रॅली, मिरवणूका आणि सभा घेण्यास 27 जूनपर्यंत ठाणे पोलिसांतर्फे बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. सुधारक पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच ध्वनीक्षेपणाच्या वापरामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व ध्वनिक्षेपक विक्रेते, दुकानदार, आस्थापना यांनी त्यांच्याकडून ज्या ग्राहकाने ध्वनिक्षेपक किंवा त्या संबंधीचे साहित्य खरेदी केले असेल त्या संबंधित व्यक्तीची माहिती जवळील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे.

माहितीनुसार, विक्रेत्यांनी ध्वनिक्षेपक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे नाव,पत्ता,ओळखपत्र,आधारकार्ड, संपर्क क्रमांक, वीज देयक यांची तपासणी करून तसेच खरेदी केलेल्या ध्वनीक्षेपकांची संख्या आणि कोणत्या उद्देशाने खरेदी केले आहे, याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे.

दरम्यान, 4 तारखेपासून मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल, असा औरंगाबाद येथे राज ठाकरेंनी झालेल्या भाषणात इशारा दिला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र राजकारणात नेमकं काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now