महाराष्ट्र राज्यात शिंदे- फडणवीस यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारच्या पहिल्यावहिल्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. म्हणाले, हे गद्दारांचं बेकायदेशीर सरकार असून ते लवकरच कोसळणार आहे. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेला भाजप नेत्यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. सध्या त्यांचे हे ट्विट चर्चेत आले आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘गद्दार, लोकशाहीचा खून… ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहरा ही पाहात जा आदित्य ठाकरे…,’ अशा खोचक शब्दात आदित्य ठाकरेंवर अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1559772936512212993?t=TXjmx5EDbZagrrA04Wkjdg&s=19
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आम्ही २०१९ मध्ये सत्तांतर करून देशाला नवा पर्याय दाखवला. दुर्दैवाने आमच्यातील काही जण गद्दार निघाले असून त्यांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ज्यांना मंत्रिपदावर संधी दिली त्यांचंही आता डिमोशन झालं.
आमच्याकडे असताना ते बरे होते. आता पुन्हा आमचे दरवाजे खुले आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात असेल. मात्र सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान आदित्य ठाकरेंनी केलं.