आत्तापर्यंत आपण माणसाला दारूचे वेसन लागले, आणि आता त्या व्यक्तीची दारू सुटत नाही असे कित्येकदा ऐकले. अशा व्यक्तीची दारू सुटण्यासाठी मग अनेक प्रकार केले जातात. मात्र तुम्ही एका कोंबड्याला दारूचे वेसन लागले हे याआधी ऐकले नसेल. हो हे खरंय एका कोंबड्याला चक्क दारू पिण्याची सवय लागली, त्यामुळे त्याचा मालक चिंतेत आहे.
भंडारा शहरानजीक असलेल्या पिपरी पुनर्वसन गावातील भाऊ कातोरे हे पेशाने शेतकरी आहेत. त्यांनी पाळलेल्या कोंबड्याची ही कहाणी आहे. भाऊ कातोरे शेतीसोबतच कुक्कुटपालन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे विविध प्रजातीचे कोंबडे पाहायला मिळतात. मात्र, आता ते त्यांच्याकडे असणाऱ्या एका दारुड्या कोंबड्यामुळे चिंतेत आहेत.
त्यांच्याकडे असणाऱ्या एका कोंबड्याला दारू पिण्याची सवय लागली आहे. कोंबडयाला दारुचं व्यसन एवढं जडलं आहे की, दारू पिल्याशिवाय कोंबडाच्या घशात अन्न-पाणीही जात नाही. दर ४ दिवसांना दारूची एक क्वार्टर तो रिचवतो. त्याच्या या सवयीमुळे शेतकऱ्याला महिन्याला २ हजारांचा भुर्दंड पडतो.
आता या कोंबड्याला दारू पिण्याची सवय कशी लागली असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आला असेल. तर झालं असं की, कोंबड्याला काही महिन्यांपूर्वी ‘मरी’ हा आजार झाला होता. कुणीतरी त्यावर मोहफुलांच्या दारूचा उपाय सांगितला. मोहाची दारू सहसा मिळत नसल्यानं आपल्या लाडक्या कोंबड्यासाठी शेतकऱ्याने चक्क विदेशी मद्य आणलं.
कोंबड्याला दारू पाजल्याने त्याचा रोग तर बरा झाला, पण आता हा कोंबडा पक्का बेवडा बनला आहे. दर ४ दिवसांना दारूची एक क्वार्टर त्या कोंबड्याला लागते. शेतकऱ्याला या कोंबड्याची ही सवय महागात पडत आहे. दर महिन्याला २ हजार रुपये कोंबड्याच्या दारूसाठीच जाऊ लागले आहेत.
हा कोंबडा कातोरेंच्या घरात सगळ्यांचाच लाडका आहे. त्यामुळे तो व्यसनाधीन झाला असला तरी त्याचे हे लाड देखील पुरवले जात आहेत. या कोंबड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी कोंबड्याची ही सवय ऐकून आश्चर्य व्यक्त केले आहे. तर कोणाला अजूनही कोंबडा दारू पितो यावर विश्वास बसेनासा झाला आहे.