महाराष्ट्रात काही दिवसांपासून सुरू असलेले सत्तांतराचे राजकीय नाट्य संपण्याच्या मार्गावर असतानाच आता बिहारमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे राजकीय ड्रामा रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार वेळीच सावध झाल्याची माहिती मिळत आहे.
बिहारमध्ये भाजपकडून दगाफटक्याचा चाहूल लागल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार सावध झाले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलातील आरसीपी सिंह यांचा ‘एकनाथ शिंदे’ बनवून पक्षात फूट पाडण्याचा डाव होता.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी अचानक बंडखोरी केली होती. उद्धव ठाकरेंना भाजपच्या पडद्यामागे सुरु असलेल्या हालचालींचा सुगावा लागला नव्हता. मात्र, चाणाक्ष असलेल्या नितीश कुमार यांना तीन महिन्यांपूर्वीच आपल्याच पक्षातील ‘मोहरा’ वापरून भाजप जदयूत फूट पाडू शकते, याचा अंदाज आला होता.
नितीश कुमार यांचा जदयूचे माजी नेते आरसीपी सिंह यांच्यावर संशय होता. त्यानुसार नितीश कुमारांनी वेळीच सर्व सूत्रे हलवत आता काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल सोबत जाऊन नवे सरकार स्थापन करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.
पडद्यामागे या सगळ्या हालचाली कशा सुरु होत्या, याची कहाणी अत्यंत रंजक आहे. माहितीनुसार, भाजपने तीन महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये ‘ऑपरेशन RCP’ सुरु केले होते. तीन महिन्यांपूर्वी JDU पक्षातील एका आमदाराला भाजप नेत्याचा फोन आला. तेव्हा भाजपच्या नेत्याने संबंधित आमदाराची नेहमीप्रमाणे विचारपूस केली.
त्यानंतर भाजपच्या नेत्याने जेडीयूच्या आमदाराला विचारले की, आरसीपी सिंह यांना तुमच्या पक्षातील ३२ आमदारांचा पाठिंबा आहे का? त्यावर जेडीयूच्या नेत्याने हा दावा फेटाळून लावला. असं होऊच शकत नाही, नितीश कुमार यांच्याच पाठिशी संपूर्ण पक्ष उभा आहे, असे जेडीयूच्या आमदाराने संबंधित भाजप नेत्याला सांगितले.
नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणातील या छुप्या वाऱ्यांचा योग्य अंदाज घेतला. आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून जेडीयूत फूट पाडली जाणार, हे कळाल्यानंतर नितीश कुमार यांनी धीर अजिबात सोडला नाही. आरसीपी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयूतील ३२ आमदार फोडण्याचा प्लॅन होता.
नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांचे पंख पद्धतशीरपणे कापले. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यास नकार देण्यात आला. पाटणा येथील त्यांचा सरकारी बंगला काढून घेण्यात आला. तसेच त्यांच्या संपत्तीचा तपशील जेडीयू कडून जाहीर करण्यात आला. त्यामुळे आरसीपी सिंह यांची चांगलीच कोंडी झाली.