एक लाख रोजगाराच्या संधी मिळवून देणारा तसेच १.५४ लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता – फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
या सर्व प्रकरणावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली होती की, वेदांता आणि फॉक्सकॉनचा कल हा गुजरातकडे जास्त दिसतोय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली होती. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.
याबाबत लागलीच मी त्यांना फोन लावून हा प्रकल्प गुजरातला का नेत आहात, याची विचारणा केली. गुजरात जी सुविधा देत आहे, त्यापेक्षा अधिक द्यायला आम्ही तयार आहोत, अशी चर्चा केली. यासाठी मी स्वतः अनिल अग्रवाल यांच्या घरी गेलो होते.
मात्र, त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये प्रकल्प स्थापन करण्याबाबत आम्ही खूप पुढे गेलो आहोत. करार वगैरे झाले आहे. आमचा कल महाराष्ट्राकडेही आहे. निश्चितच आगामी काळात आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करू, असे आश्वासन त्यांनी मला त्यावेळी दिले, असे फडणवीस म्हणाले.
गुजरात हा काही पाकिस्तान नाही. तो महाराष्ट्राचा लहान भाऊच आहे. महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती एकाच दिवशी झाली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकला नाही.
राज्यात प्रस्तावित असलेला रिफायनरीचा प्रकल्प आणि वाढवण बंदराचा प्रकल्प आकाराला आला असता तर महाराष्ट्र औद्योगिक विकासात इतर राज्यांपेक्षा १० वर्षे पुढे जाऊन पोहोचला असता. मात्र हे शक्य झाले नाही. आता आम्ही हे दोन्ही प्रकल्प राज्यात आणणारच आहोत. त्यामुळे आताच्या घडीला महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यात गुजरातपेक्षा पिछाडीवर असला तरी येत्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाणार, असे फडणवीस यांनी म्हटलं.