मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्यावरून महाराष्ट्र राजकारण चांगलंच तापलं आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी केली, त्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला. असे असताना आता औरंगाबाद मधील एका व्यक्तीने मुंबईतील शिवाजी पार्कवर नमाज पठण करू देण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर नमाज पठण करू देण्याची मागणी करणारा व्यक्ती औरंगाबाद मधील असून, त्याचं नाव नईम शेख आहे. हा व्यक्ती एक वकील आहे. त्यानं केलेल्या मागणीमुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र राजकारणात नवा वाद पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नईम शेख यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी रमजान ईदला शिवाजी पार्कवर नमाज पठण करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पत्रात नमूद केलं की, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आहेत. त्यांना नमाज अदा करायला दुसरी मोठी जागा नाही. त्यामुळे हे मैदान नमाज पठणासाठी देण्यात यावे अशी मागणी केली.
तसेच नईम शेख यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात आपले मत व्यक्त केले. म्हणाले, जर गुढी पाडवा, महाराष्ट्र दिन, बाल दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस, या सर्वांसाठी शिवाजी पार्क दिले जाते. हे दिवस साजरे करण्यासाठी 5 दिवस हे शिवाजी मैदान राखीव ठेवलं जातं.
तर मग , या कार्यक्रमासाठी ज्याप्रमाणे शासन परवानगी देते, आणि विविध कार्यक्रम या मैदानात होतात, तसेच नमाज अदा करण्यासाठी देखील हे मैदान देण्यात काय हरकत आहे. एक दिवस शिवाजी पार्क मैदान नमाज पठणासाठीही द्यावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.
नईम शेख यांनी केलेल्या मागणीनंतर आता समाजातील विविध भागातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यावर म्हणाले की, हिंदू जर घरात पूजा करतात, तर मग नमाज रस्त्यावर कशाला पढायला हवी? तुम्ही घरातच नमाज अदा करा. अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.