Share

‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’; महिला शिवसैनिकांचा बंडखोर आमदारांना इशारा

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं. यामध्ये शिवसेना पक्षाचे तब्बल ३९आमदार फुटले. या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात सुरुवात केली आहे.

शिवसैनिकांनी या बंडाला न जुमानता नव्या ऊर्जेने पक्षासाठी काम करावे व पुन्हा पक्षाला मजबुती द्यावी या उद्देशाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कामाला लागले आहेत. आदित्य ठाकरे हे देखील ठिक ठिकाणी शिवसेनेचे मेळावे घेऊन जनतेला संबोधित करत आहेत.

काल, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी महिलांचेही मत जाणून घेतले.

तसेच त्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीही जाणून घेतली. यावेळी या महिला रणरागिणींनी शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. गेले ते कावळे, राहिले ते मावळे असं सांगत आमच्या हातात शिवबंध आहे. आम्ही पुन्हा शिवसेना उभी करू, असं या रणरागिणी म्हणाल्या.

यावेळी, साताऱ्याहून आलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकारी महिलेने पोटतिकडकीने आपली भावना व्यक्त केली. तालुक्यातील आमदाराच्या अकार्यक्षमतेचा पाढाही वाचला. गेले ते कावळे राहिले ते मावळे. या मावळ्यांच्या जीवावर अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर आम्ही हिंदुस्थान उभा करू. अशी ती म्हणाली.

राज्यभरात शिवसेना पोहचवू. साहेब तुम्ही चिंता करू नका. घाबरू नका. एक पुरुष एका घरात जाऊ शकतो. पण माझी प्रत्येक महिला प्रत्येकाच्या चुलीपर्यंत जाऊन कुटुंबाला पक्षात आणू शकते, असंही या महिलेने सांगितलं आहे. तसेच म्हणाली, सातारा जिल्ह्यातील आमदार गेले. त्यांचं कधी काम नव्हतं. त्यामुळे ते गेले तरी आम्हाला फरक पडत नाही.

तर दुसरी एक महिला म्हणाली, धारेशिवाय किमत नाही तलवारीच्या पातीला, कसल्या शिवाय पिक नाही जमिनीतल्या मातीला आणि शिवसेनेशिवाय, उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही बेरोजगारांच्या साथीला, असं ही महिला म्हणाली. महाराष्ट्रात ताकद उभी करायची असेल तर सर्वांनी उद्धव ठाकरेंच्या पाठी उभे राहा.

तुम्ही घाबरू नका साहेब. जे गेले ते जाऊ द्या. कुणाचाही कोण येऊ दे. आम्ही त्यांना कधीच मदत करणार नाही. गेले उडत. आम्ही त्यांच्यासोबत आधीही नव्हतो आणि आताही नाही. आमच्या मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत, अशी ही महिला म्हणाली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now