सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ महाकाळ सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या अटकेत आहे. तपासादरम्यान त्याने एक खळबळजनक दावा केला आहे. सलमान खानसह एक बडा बॉलिवूड डायरेक्ट देखील लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या रडारवर होता, असे त्याने म्हटलं आहे.
बिष्णोई टोळीने यापूर्वी अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता बॉलिवूडमधील बडा दिग्दर्शक देखील हिट लिस्ट वर होता, असे सौरभ महाकाळ याच्या तपासादरम्यान समोर आले. हा दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर होता.
याप्रकरणी मुबंईतील बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. करण जोहर कडून पाच कोटी रुपयांची खडणी वसूल करण्याचा त्यांचा प्लान होता. मुबंई पोलिसांनी देखील याबाबत पुण्यात येऊन महाकाळची चौकशी केली होती. या सर्व घटना समोर आल्यामुळे आता चाहत्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली. त्याच्या सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये पोलिसांना काही जणांवर संशय असून, त्यात पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे यांचा समावेश आहे.
माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता. दोघेही २०२१ पासून फरार होते. संतोष जाधव याने राण्या बाणखेले याची हत्या केली होती. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. अखेर त्याला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तर सौरभ महाकाळ याला मकोका गुन्ह्यातील आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ महाकाळची चौकशी झाली. त्यात त्याने लॉरेन्स बिष्णोई च्या लिस्टमध्ये सलमानसह करण जोहर देखील टार्गेट असल्याचं म्हटलं आहे. मात्र , सौरभ महाकाळ हा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे मत आहे.