मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात दुःखद घटना घडल्या आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) निधन झाले. मात्र त्याअगोदर मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातही काम केले आहे.
त्यांचे नाव दिग्गज अभिनेते रमेश देव असे आहे. रमेश देव यांचे २ फेब्रुवारी रोजी हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. निधनाच्या अगोदर म्हणजेच ३० जानेवारीला त्यांनी आपला वाढदिवस देखील साजरा केला होता. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले. तसेच ते त्या काळातील देखणा हिरो म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या भूमिकेप्रमाणेच त्यांची आणि पत्नी सीमा देव यांची प्रेमकहाणी देखील खूप गाजली होती. त्याचबरोबर त्यांचे निधन होण्याअगोदर अगोदरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ‘हे तर काहीच नाय’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाचा आहे. हा कार्यक्रम रमेश देव यांच्या जीवनातील शेवटाचा कार्यक्रम ठरला.
त्यावेळी ‘जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए’ हा संवाद देखील या कार्यक्रमात लावण्यात आला होता. तसेच ‘सुर तेची सोडिता, गीत उमटले नवे’ या गाण्यावर रमेश देव यांनी डान्स देखील केला. हा कार्यक्रम झी मराठीवर आज (११ फेब्रुवारी) प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर झी मराठीकडून एक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर कऱण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना त्या कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाटत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
रमेश देव यांच्यासह श्रीरंग गोडबोले, अशोक हांडे हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या अनेक आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा देण्यात आला. तसेच ‘सुर तेची सोडिता, गीत उमटले नवे’ या गाण्यावर रमेश देव यांनी अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि अक्षया देवधरसोबत डान्स केला. हा कार्यक्रम आज प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच रमेश देव त्यांच्या चाहत्यांसाठी ही त्यांची शेवटचे झलक आहे.
रमेश देव यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून भूमिका साकारली. याच चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. रमेश देव यांनी जवळजवळ २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.